भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून महाराष्ट्रात 25 जूननंतरच सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकणात दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल मंदावल्याने राज्यातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज असल्याने मुंबईकरांना अद्यापही पावसाचा दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
सामान्यतः नैऋत्य मोसमी पाऊस मुंबईत 11 जूनच्या आसपास पोहोचतो. मात्र यंदा 19 जून उलटूनही मान्सून तर दूरच, पूर्वमान्सूनच्या सरीदेखील अद्याप बरसलेल्या नाहीत. गेल्या दोन दशकांत मान्सूनच्या आगमनाला एवढा विलंब झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. केरळमध्ये 4 जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते आणि त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे 6 जूनपर्यंत तो तळकोकणात पोहोचला. मात्र त्यानंतर त्याची प्रगती मंदावली असून दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल अद्यापही ठप्प आहे.
गेल्या आठवड्याभरापासून हा वेग मंदावला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. याशिवाय नैऋत्येकडून वाहणारे वारेही कमकुवत झाले आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये याचा परिणाम झाला असून आर्द्रयुक्त वाऱ्यांचा प्रवाह येथे कमी झाला आहे.
हिंदी महासागरात तयार होणाऱ्या मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन या हवामान घटनेचा मान्सूनच्या प्रवासावर मोठा प्रभाव पडतो. हे प्रणाली पूर्व दिशेने सुमारे 4 ते 5 मीटर प्रति सेकंद वेगाने पुढे सरकते आणि साधारण 30 ते 60 दिवसांच्या कालावधीत वातावरणात ठळक बदल घडवू शकते.