या वर्षीचा मान्सून भारतात नियोजित वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, नैऋत्य मान्सून आता पुढे सरकण्यास सज्ज झाला आहे. मान्सूनने अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा (Bay of Bengal) काही भाग व्यापला असून, श्री विजय पुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, वायव्य, पश्चिम आणि मध्य भारतामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कायम राहील. ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
साधारणपणे, नैऋत्य मान्सून 20 मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्रात प्रवेश करतो. त्यानंतर तो पोर्ट ब्लेअर आणि उत्तर अंदमान समुद्रात पोहोचतो. केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख 1 जून आहे. तथापि, या वेळी तो नियोजित वेळेपेक्षा लवकर अंदमान समुद्रात पोहोचला आहे. मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात दाखल होण्याची शक्यता असून 6 जूनपर्यंत तो कोकणात पोहोचू शकतो. तसेच 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये १९ मे पर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 ते 19 मे दरम्यान मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात 15 ते 18 मे दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर आसाम आणि मेघालयमध्ये 15 ते 19 मे दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये देखील 15 मे पर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अंदमान आणि निकोबार बेटांवर 19 मे पर्यंत मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तसेच ताशी 30-60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात 17 मे पर्यंत तुरळक पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही पुढील काही दिवस पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू राहील.