भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मोहित कंबोज यांनी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. शिवसैनिकांनी बळजबरीने गाडीतून बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांनी सांताक्रूझ पोलीस स्थानकात त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तक्रार नोंदवली आहे. वांद्रे येथील कलानगरजवळच्या सिग्नलवरील सीसीटीव्हीत चित्रीत झालेल्या प्रतिमेतून या घटनचे सत्य समोर येईल, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच याप्रकरणातील सूत्रधाराचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.
शुक्रवारी भाजप नेते मोहित कंबोज यांची गाडी मातोश्रीबाहेरुन जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मोहित कंबोज रेकी करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. तसेच, मोहित कंबोज शिवसैनिकांवर हल्ला करण्यासाठी आल्याचा आरोप शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला. दरम्यान, मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे सर्व आरोप खोडून काढले. तर हल्ल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर, जयंत पाटील कंबोज यांची भेट घेतली. तसेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कंबोज यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे.