रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोकणात समुद्रकिनाऱ्यांची काटेकोर तयारी

रत्नागिरीत 7 मे रोजी सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोस्ट गार्ड, पोलीस, नौदल आणि प्रशासन सहभागी. सजगता आणि समन्वय वाढवण्याचा उद्देश.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी मॉक ड्रिल; कोकणात समुद्रकिनाऱ्यांची काटेकोर तयारी

रत्नागिरी: सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या कोकण किनारपट्टीवर मॉक ड्रिलसारखी हालचाल सुरू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (7 मे) सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी व्यापक स्वरूपात मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली असून, यामध्ये कोस्ट गार्ड, पोलीस, नौदल आणि स्थानिक प्रशासन सहभागी होणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्याची सागरी मर्यादा विस्तृत असून, जिल्ह्यात एकूण 16 लँडिंग पॉईंट्स आहेत. विशेषतः मिरकरवाडा बंदर आणि अल्ट्राटेक जेट्टी या दोन महत्त्वाच्या ठिकाणी या मॉक ड्रिलचे आयोजन होणार आहे. या ठिकाणी सागरी घुसखोरी, बेकायदेशीर हालचाली आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या परिस्थिती हाताळण्याचा सराव केला जाणार आहे.

कोस्ट गार्डच्या बोटी रत्नागिरीच्या समुद्रात गस्त घालत आहेत, आणि प्रत्येक बोटीची कसून तपासणी करण्यात येत आहे. यामधून सागरी सुरक्षेविषयी सजगता वाढवणे, स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि आपत्कालीन प्रसंगी तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता तपासणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

हेही वाचा:महाराष्ट्रात 'या' 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार; जाणून घ्या

केवळ रत्नागिरीच नाही, तर कोकणातील ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही एकाच दिवशी मॉक ड्रिल होणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे 720 किलोमीटर आहे, आणि त्यामुळे येथे सागरी घुसखोरी, तस्करी, दहशतवादी हालचाली यांसारख्या घटना रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे.

कोस्ट गार्ड, पोलीस दल, स्थानिक प्रशासन आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित अधिकारी यांचा यात समावेश असणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांचा सहभाग किंवा हस्तक्षेप नको असल्याने, स्थानिकांना या परिसरात काही काळ टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

सागरी सुरक्षेच्या दृष्टीने रत्नागिरी हे केवळ एक मच्छीमारी केंद्र नसून, एक महत्त्वाचा सागरी प्रवेशबिंदूही आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची शिथिलता भविष्यात मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते.

या मॉक ड्रिलमुळे प्रशासनाची सुसज्जता, यंत्रणांतील समन्वय, आणि प्रत्यक्ष आपत्कालीन घटनांमध्ये तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी तपासली जाणार आहे. या उपक्रमामुळे कोकणातील नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number