महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. या सोहळ्याला शिवाजी पार्कावर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित मनसैनिकांना संबोधित केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांचा आग्रह अचानक कसा आठवला?, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
राज ठाकरेंनी राज्यातील सत्तासमीकरणावर टीका केली. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना शासन काय देणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच जनेतेने हे सगळे विसरून जावे हीच यांची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे प्रकरणही उकरून काढले. उद्योगपती अंबानीच्या घराखाली स्फोटक पेरणी अजूनही गुलदस्त्यात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. अंबानीच्या घराबाहेर जिलेटीन ठेवणारा सचिन वझे जो एकेकाळी शिवसेनेत होता. हे सहज होतं का? देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली गाडी ठेवणे इतके सोपे आहे क? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचे मग चर्चा चार भिंतीत का केली? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांनी भाषणादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे राज्यात जातीयवाद पसरला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. इतिहास विसरलेल्यांच्या पायाखालचा भूगोल सरकतो, असे म्हणत गृहमंत्र्यांच्या तुरुंगात जाण्यावरून राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुंगात नव्हते असेही ते म्हणाले. तर डॉन दाऊद इब्राहिमसोबत संबंध असलेले नवाब मलिक मंत्रिमडंळात असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी केली आहे.
राज्यात मतदार गृहीत धरलं जात आहे. मतदाराच्या नाकावर टिच्चून राजकारण सुरू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. तसेच समाज राजकीयदृष्ट्या प्रगल्भ नसल्याची खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रात नोकरीसाठी मराठी माणसाला प्राधान्य हवे, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशाचा विकास होत आहे हे चांगलेच आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने विकासाला मत दिले आहे आणि भाजपाने सत्ता स्थापन केली, असे सांगत राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यांचे कौतुक केले. मात्र, महाराष्ट्र देशाचे ओझे वाहायला बनलेला नाही आहे, अशी खंतही राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदुत्वाबाबतदेखील स्पष्टीकरण दिले आहे. हिंदू केवळ दंगली पुरते हिंदू असतात, असे ते म्हणाले.
राज्यातील आमदारांना घर देण्याबाबतचा प्रस्ताव मविआ सरकारमध्ये समोर आला आहे. दरम्यान, आमदारांना घरे देण्याबाबत राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. आमदारांना घरे देण्यात कमिशन मिळणार आहे का? असा थेट सवाल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
झोपडपट्ट्यांमधील मशिदीत काय घडत आहे ते बाहेर कळत नाहीए, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाकाव्यात, असे आवाहन राज ठाकेर यांनी पंतप्रधानांना आवाहन केले आहे. तसेच भोंगे वाजवणाऱ्या मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर जोरात हनुमान चालीसा वाजवा, असेही ते म्हणाले.
राज्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाखाली भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात चालू असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. राज्यातील ईडीच्या नोटीशीचा विषय जुनाच असून चार महिन्यांपूर्वी आलेल्या नोटिसीबद्दल आता मुख्यमंत्री बोलत आहेत, असाही आरोप त्यांनी केला आहे. स्वत:ला हवा आहे म्हणून महापौर बंगला बाळासाहेबांच्या नावे हडप केला असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.