पाली, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मुंबई – गोवा महामार्गावरून मनसे आक्रमक झाली आहे. रस्त्याची दूरवस्था झाली असताना टोल वसुली सुरू असल्याचा निषेध म्हणून मनसेने तोडफोड केली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर राजापूर तालुक्यातील हातिवले येथे एका टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे कार्यालय मनसेच्या रत्नागिरी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फोडले. रायगड जिल्ह्यात पाली येथे रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या खासगी जेसीबीची नासधूस करण्यात आली. तसेच पाली येथे महामार्गाशी संबंधित एका कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.
मनसेकडून ठिकठिकाणी तोडफोड सुरू होताच काही भागांमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आंदोलनाच्या नावाखाली कायदा हाती घेतला तर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
याआधी बुधवार १६ ऑगस्ट रोजी पनवेल येथे मनसेचा निर्धार मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुंबई – गोवा महामार्गाच्या दूरवस्थेसाठी जबाबदार असलेल्यांना जाब विचारला पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले. रस्त्याची अवस्था एवढी वाईट असूनही या भागातील ठराविक लोकप्रतिनिधी प्रत्येक निवडणुकीत निवडून कसे येतात, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गाच्या दूरवस्थेचा निषेध म्हणून ठिकठिकाणी आंदोलन केले.