महाशिवारात्रीच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविक जात आहेत. अशाचत एक मोठी दुर्घटना घडली आहे. मध्यप्रदेश येथील सिहोरमध्ये मोफत रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. यासाठी देशभरातून लाखो भाविक येथे पोहोचले आहेत. त्यामुळे सिहोरला जाणाऱ्या रस्त्यावर कोंडी झाली आहे. लाखोंच्या संख्येत भाविक आल्याने काही प्रमाणात चेंगराचेंगरी देखील झाली. बुलडाणा जिल्ह्यातूनही अनेक भाविक सिहोरला गेले आहेत.
त्यातील तीन महिला भाविक बेपत्ता झाल्याची तक्रार बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांनी खामगाव पोलिसात दिली आहे. सिहोरला गेलेल्या भाविकांशी संपर्क होत नसल्याने ही तक्रार देण्यात आली आहे. या महिला वाडी, सुटाळा खुर्द इथल्या रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. याच महोत्सवात गर्दीमुळे प्रचंड गोंधळ उडालेला आहे. यात अनेक जिल्ह्यातील लोक सध्या बेपत्ता असल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत.
गेल्या वर्षभरात पंडित मिश्रा महाराज यांची ख्याती जगभर पसरली असून त्यांना मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. शिवरात्रीनिमित्ताने दर्शनासाठी भाविक जात आहेत. त्याच महत्वाचं कारण म्हणजे रुद्राक्ष मानवी जीवन बदलते आणि पवित्र स्थान असलेल्या सिहोरचे रुद्राक्ष फायदेशीर असल्याचं महाराज सांगतात. तसेच महाराजांनी सुचवलेले उपाय आणि प्रवचन उत्तम असल्याने त्यांच्यावरील निष्ठा दिवसेंदिवस वाढत आहे.