राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी स्वतः ट्विट करून माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोविड चाचणीचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर आता मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मंत्री देसाई म्हणाले, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो.”
नुकतेच विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं यावेळी हे सर्वच नेते सभागृहात उपस्थित होते. त्यामुळं आमदारांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाचे १८०५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा १० हजारांच्या पुढे पोहोचला आहे. सध्या देशात १० हजार ३०० कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. महाराष्ट्रात कोविडचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे.