वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशात खेडोपाडी मोबाइल नेटवर्क पोहोचल्याचा कितीही दावा सरकारकडून केला जात असला तरी एका घटनेमुळे मात्र तो फोल ठरल्याचे दिसत आहे.
सर्वसामान्यांसांठी ही समस्या काय नवी नाहीये पण खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे.
केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील धोलिया या लहानश्या गावी गेले होते.
मेघवाल यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी मेघवाल यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला.
पण, लोकांनी या गावात मोबाइल नेटवर्क नसल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनीच झाडाला शिडी लावून त्यावर चढून मोबाइल लावला तर नेटवर्क मिळेल, असा
सल्ला दिला.
लगेचच त्यांच्यासाठी शिडीची सोय करण्यात आली. आश्चर्य म्हणजे मेघवाल यांनी असे करताच त्यांचा फोन लागला. झाडावरच त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावला आणि
गावातील समस्येबाबत सांगितले.