जळगाव : मंत्री गिरीश महाजन यांचे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 17/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून गिरीश महाजन यांचे AI-निर्मित अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून आक्षेपार्ह, बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.