बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात मध्यरात्री घडलेल्या घरफोडीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावातील दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या घराला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही घटना त्या वेळी घडली जेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते.मिळालेल्या माहितीनुसार, घरात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांची पत्नी अश्विनी देशमुख, आई आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते. सर्वजण आपापल्या खोलीत विश्रांती घेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश केला. इतक्या लोकांची उपस्थिती असूनही चोरट्यांनी अत्यंत चलाखीने घरफोडी केल्याचे दिसून येते.सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर घरातील वस्तू विस्कळीत अवस्थेत आढळल्या. यानंतर चोरी झाल्याचे लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला. तात्काळ स्थानिक पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेची टीमही तपासासाठी बोलावण्यात आली आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.या प्रकारामुळे मस्साजोग गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिष्ठित कुटुंबाच्या घरात अशी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. दरम्यान, पोलिसांकडून तपास जलदगतीने सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली आहेत. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.