शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क किडे आणि आळ्या आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वांजोळा या गावातील अंगणवाडीमध्ये ही घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांच्या पासून पोषण आहाराबाबत तक्रारी येत असल्याने जिल्हापरिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी आज अचानक पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे.
शालेय पोषण आहार योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने पोषण आहार देण्यात येतो. ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सकस आहार मिळावा म्हणून ही योजना राबविली जाते. मात्र या योजनेतील गलथानपणा आणि गैरव्यवहारामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळेच जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावातील अंगणवाडीमध्ये जिल्हापरिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी पाहणी केली असता त्यांना पोषण आहाराच्या पाकिटांच्या मध्ये आळ्या आणि किडे आढळून आले.गामीण भागातील मुलांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ त्वरित थांबवावा आणि संबंधितांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी पल्लवी सावकारे यांनी शासन कडे आता केली.
अंगणवाडी पोषण आहारात बुरशी आळ्या, किडे ,गोम आणि अगदी सापाची पिल्लंही निघत असल्याच्या तक्रारी आत्तापर्यंत झाल्या आहेत. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही कोणतीही सुधारणा केली गेली नाही. अखेर असाच आहार विद्यार्थ्यांना द्यावा लागत असल्याची खंत शिक्षकांनी व्यक्त केली आहे. मात्र तरीही याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार हा प्रश्न आहे.