मुंबई: मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या 2,640 घरांच्या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत आज, 28 मे रोजी संपणार आहे. सुरुवातीला या सोडतीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. मात्र घरांच्या किंमतीत कपात आणि अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर आता अर्जदारांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले आहे.
म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तब्बल 88 हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी 62 हजारांपेक्षा जास्त अर्जदारांनी अनामत रक्कम भरून सोडतीत सहभाग निश्चित केला आहे. त्यामुळे अंतिम दिवशी अर्जदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या सोडतीत मुंबईतील अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये घरे उपलब्ध करण्यात आली आहेत. विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, गोराई, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, वडाळा, पवई, दादर आणि मानखुर्द या परिसरांमध्ये विविध गटांसाठी सदनिका उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या घरांपैकी मोठ्या संख्येने घरे अद्याप बांधकामाधीन आहेत. विक्रोळीतील कन्नमवार नगर, गोरेगाव आणि बोरिवली येथील अनेक प्रकल्पांमध्ये काम सुरू असून त्याचाही या सोडतीत समावेश करण्यात आला आहे.
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणखी एक मोठी संधी! चला तर आता ही संधी सोडू नका, आजच अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करा : https://t.co/EttUtdfMZm
.
.#MHADA #MhadaLottery2026 #DreamHome #AffordableHousing #MumbaiHomes pic.twitter.com/LP3J27gUby — MHADA (@mhadaofficial) May 14, 2026
सुरुवातीला घरांच्या किंमती जास्त असल्याने अनेकांनी अर्ज करण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर म्हाडाने काही घरांच्या किंमतीत सुमारे 7.5 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला. विशेषतः विक्रोळी परिसरातील मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांच्या दरात घट झाल्याने अर्जदारांचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून आले.
यंदाच्या सोडतीतील सर्वात महागडी घरे दक्षिण मुंबईतील ताडदेव भागात असून त्यांची किंमत सुमारे 6.82 कोटी रुपये इतकी आहे. तर सर्वात स्वस्त घरांची सुरुवात मानखुर्द परिसरात सुमारे 29 लाख रुपयांपासून होत आहे. गोरेगावमधील 300 चौरस फूट घरांसाठी सुमारे 32 लाख रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे.
म्हाडाने अर्ज प्रक्रियेबाबतही स्पष्ट वेळापत्रक जाहीर केले आहे. इच्छुक अर्जदार आज रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अनामत रक्कम भरण्यासाठी 29 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्जांची प्राथमिक यादी जून महिन्यात प्रसिद्ध केली जाणार असून त्यावर हरकती आणि दावे नोंदवण्याची संधी अर्जदारांना मिळणार आहे.
मुंबईसारख्या शहरात घरांच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य नागरिकांसाठी घर घेणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत म्हाडाच्या सोडतीकडे अनेक जण परवडणाऱ्या घरांच्या आशेने पाहत आहेत. त्यामुळे अंतिम दिवशी अर्जासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.