बॉलिवूडमधील #MeToo च्या प्रकरणात नवनवीन आरोप पुढे येत आहेत. आता बी ग्रेड सिनेमांतील अभिनेत्री आणि माजी ‘बिग बॉस’ स्पर्धक पायल रोहतगी हिनेही आता बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी याने आपला विनयभंग केल्याचा आरोप पायल रोहतगीने केला आहे. 2011 साली ‘शांघाय’ या सिनेमाच्या ऑडिशनच्या वेळी दिबाकर बॅनर्जी याने आपल्याला कपडे काढून पोट दाखवण्यास सांगितलं होतं, असा आरोप पायल रोहतगीने केला आहे.
दिबाकर आणि पायल दोघे पूर्वी चांगले मित्र असल्याचं पायलने म्हटलं. मात्र ‘शांघाय’ चित्रपटात काम देण्याच्या बदल्यात दिबाकरला पायलशी शारीरिक संबंध ठेण्याची इच्छा असल्याचं लक्षात आल्यावर पायलने त्याच्याशी मैत्री तोडली, असं स्वतः पायलने सांगितलं. या गोष्टीची माहिती यशराज फिल्म्सलाही असल्याचं पायलने म्हटलं.
नेमकं काय घडलं?
‘शांघाय’ या सिनेमाची ऑडिशन झाल्यानंतर दिबाकर बॅनर्जी याने आपल्याला रात्री दारूच्या नशेत कॉल केल्याचा आरोप पायलने केला. यावेळी पायल कुठ आहे याची माहिती विचारून तो तिच्यापाशी पोहोचला. तू जाडी झाली असून सिनेमातील भूमिकेसाठी तुला बारीक होण्याची गरज आहे, असं दिबाकर तिला म्हणाला. यानंतर तुझा शर्ट काढ आणि मला तुझं पोट दाखव, असं दिबाकर म्हटल्याचा आरोप पायलने केला आहे. दिबाकरचं बोलणं ऐकून ‘तुला वेड लागलंय का? एक मुस्कटात देऊ का?’ असं उत्तर आपण दिल्याचा दावा पायलने केला आहे.
पायलच्या आरोपावर आता दिबाकर बॅनर्जीकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.