बदलत्या वातारणामुळे त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असल्याच सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे काही भागांत तापमान वाढत असल्याने उकाडा जाणवू लागला आहे, तर दुसरीकडे थंडीची झळ अद्याप पूर्णपणे कमी झालेली नाही. अशातच आता हिवाळ्यात पावसाच्या सरींचा मारा होणार आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात 28 जानेवारी रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही भागांत हवामान अंदाज दर्शवला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धोका असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
यावेळी कोकणात कमाल तापमान 26 ते 28 आणि किमान 22 ते 24 अंश सेल्सिअस इतका राहणार असून ढगाळ वातावरण राहील. तसेच पुण्यात कमाल तापमान 26 ते 29 आणि किमान 15 ते 20 अंश सेल्सिअस इतका राहील ज्यामुळे पुण्यात गारवा कमी राहील. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, धुळ्यामध्ये तुरळक या भागांत अवकाळी पावसाची सर्वाधिक शक्यता आहे.
त्यामुळे या भागांत कमाल तापमान 28 ते 32 अंश, किमान 15 ते 19 अंश सेल्सिअस इतका असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी याठिकाणी कमाल तापमान 29 ते 31 अंश, किमान 16 ते 20 अंश सेल्सिअस इतका असण्याची शक्यता आहे. ज्यामुळे याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस, सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे. तर विदर्भात कमाल तापमान 28 ते 32 अंश आणि किमान 15 ते 18 अंश सेल्सिअस इतका राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे काही ठिकाणी धुके आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्याचे आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.