अमरावती : मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. धारणी पोलिस ठाण्यात सेंट्रल किचनच्या मालकासह सहा जणांविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेळघाट परिसरातील चार आदिवासी आश्रमशाळांमधील अनेक विद्यार्थ्यांना भोजन केल्यानंतर विषबाधेची लक्षणे जाणवली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने अन्नपुरवठा आणि त्याच्या गुणवत्तेची चौकशी सुरू केली होती.
प्राथमिक तपासात विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेले अन्न निकृष्ट दर्जाचे आणि योग्य प्रकारे तयार न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर धारणी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिसॉर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीमार्फत सेंट्रल किचनच्या माध्यमातून मेळघाटातील आश्रमशाळांना भोजन पुरविले जात होते. या प्रकरणात कंपनीचे मालक विजय बोथरे, कुणाल उडाणे यांच्यासह स्थानिक पातळीवर भोजन वितरणाचे काम पाहणारे सचिन सातपुते, तसेच स्वयंपाकी संदीप सिंग, महेश देसाई आणि ओमकार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 125(a), 125(b), 274, 3(5), 59(II), 59(III) आणि 56 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला असून, तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या घटनेनंतर पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. आश्रमशाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थांची नियमित तपासणी करण्याची मागणीही होत आहे.