मुंबई , १९ मे २०२३, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी ‘मविआ’मध्ये १६-१६ जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती चुकीची असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये १६-१६ जागांचा असा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भातील प्राथमिक चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले,
शरद पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कोणी, कुठे बैठक घ्यायची याबाबत चर्चा झाली. मात्र जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि कायम राहिल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या मविआच्या वज्रमुठीनेच लढवल्या जातील, तर कोणी काहीही म्हणो पण आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही आणि होणारही नाही, सध्या सत्तेत असलेल्या शिंदे फडणवीस सरकारला घटनाबाह्य करत सत्तेतून घालवू. तसेच २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व १९ जण निवडून येतील.