Pune Landslide: मावळमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे घरावर दरड कोसळली; संपूर्ण कुटुंब अडकल्याची शक्यता, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात घरावर दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. NDRFसह प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Pune Landslide: मावळमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे घरावर दरड कोसळली; संपूर्ण कुटुंब अडकल्याची शक्यता, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

पुणे: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सोमवारी (६ जुलै) पहाटे घडलेल्या एका गंभीर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पाटण गावातील एका घरावर अचानक दरड कोसळल्याने घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)लाही पाचारण करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून संबंधित घरावर कोसळला. दरड कोसळल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळचे तहसीलदार घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी उपलब्ध यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र, घटनेबाबत अद्याप अधिकृतरीत्या जीवितहानीची पुष्टी करण्यात आलेली नाही.

हेही वाचा: Mankhurd Chawl Collapse : धक्कादायक! मानखुर्दमधील तीन मजली चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 5 मुलांचा समावेश

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पुणे येथील पाचव्या बटालियनची मदत घेण्यात आली आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे विशेष पथक आवश्यक बचाव साहित्य आणि उपकरणांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. या पथकात एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी आणि २७ प्रशिक्षित जवानांचा समावेश आहे.

बचाव पथकाकडून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीने अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक नागरिकही प्रशासनाला सहकार्य करत असून परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Rain Accident : मुंबईत पावसाचा जोर कायम असताना दुर्घटनांचे सत्रही सुरू; कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटनांचा धोका वाढला आहे. हवामान विभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या संपूर्ण परिसरात बचावकार्य सुरू असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा प्रयत्नशील आहेत. या घटनेबाबतची अधिकृत माहिती आणि बचावकार्याची प्रगती प्रशासनाकडून वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number