बुलढाणा जिल्ह्याला आता लवकरच खुशखबर मिळणार आहे. मा जिजाऊंचे जन्मगाव असलेल्या सिंदखेड राजा नगरीचं नाव आता बदलून “मातृतीर्थ जिजाऊ नगर” होणार आहे. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयात प्रधान सचिवांकडे पाठवला आहे. महाराष्ट्र शासनाकडे तसा प्रस्ताव पाठवल्याने आता सिंदखेडराजा शहराचे नाव बदलून मातृतीर्थ जिजाऊ नगर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच यावर निर्णय होऊन सिंदखेड राजा नगरीचे नाव आता मातृतीर्थ जिजाऊ नगर होणार ही बुलढाणाकरांना नवीन खुशखबरच म्हणावी लागेल.
समाजसेवक संतोष बंगाळे यांनी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून २०१७ पासून शासनदरबारी पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी दखल घेत नामांतराचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत राज्य शासनाच्या प्रधान सचिवांकडे तसा प्रस्ताव सादर केला आहे. आता लवकरच सिंदखेड राजाचे नामकरण मातृतीर्थ जिजाऊनगर असे होणार आहे.
आदर्श राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणास्थान व मार्गदर्शक मातोश्री जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड राजा येथे झाला. राजमाता माँसाहेब जिजाऊ ज्या ठिकाणी राहत होत्या, तो ऐतिहासिक राजवाडा सध्या अस्तित्वात आहे. ते एक प्रसिद्धपर्यटनस्थळ आहे. माँ जिजाऊ यांचे वडील लखुजीराजे जाधव व त्यांच्या मुलांची युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळी माथा टेकविण्यासाठी देशभरातून जिजाऊभक्त येतात. आदर्श माता माँसाहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ म्हणून सिंदखेड राजा शहराची देशभरात ओळख आहे. या शहराला मातृतीर्थ जिजाऊनगर असे नाव देण्यात यावे, अशी मागणी सिनगाव जहागीर येथील समाजसेवक संतोष बंगाळे यांनी वारंवार केली होती.
सिंदखेड राजा तहसीलदारांनी तांत्रिक बाबी पूर्ण करत सविस्तर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ८ फेब्रुवारी रोजी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवांना सविस्तर पत्र देऊन सिंदखेड राजाऐवजी ‘मातृतीर्थ जिजाऊ नगर’ असे नामकरण करण्यास शिफारस केली. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारने यामधील संपूर्ण तांत्रिक बाबी तपासून व पुरातन विभागाकडून पुरावे घेऊन या मधील त्रुटी दूर करत हा परिपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे.