बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत तब्बल ९ दुकाने जळून खाक झाली आहेत. शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केटमध्ये ही आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बे मार्केटमधील एका दुकानातून अचानक धूर निघू लागल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. काही वेळातच आगीने भीषण रूप घेत संपूर्ण परिसराला वेढले. आगीचे मोठमोठे धुराचे लोट आकाशात झेपावत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत 9 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीत किराणा, कपडे आणि इतर वस्तूंचा मोठ्या प्रमाणात साठा जळाल्याने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या घटनेतील सर्वात धोकादायक बाब म्हणजे आगीचे ठिकाण पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ होते. घटनास्थळापासून अवघ्या सुमारे 200 मीटर अंतरावर बोंद्रे पेट्रोल पंप असल्याने मोठा स्फोट होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाने वेळेत कारवाई केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार श्वेता महाले आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जळालेल्या दुकानांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे चिखली शहरात एकच खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.