Marathwada Rain: मराठवाडा पुन्हा एकदा मुसळधार पावसाच्या तडाख्यात सापडला आहे. गेल्या 24 तासांत अवकाळी पावसामुळे आठ नागरिकांचा मृत्यू झाला असून 145 पेक्षा अधिक जनावरे दगावल्याची नोंद झाली आहे. बीड, धाराशिव, जालना, लातूर, परभणीसह संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये घरे व वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नद्या व धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील 57 महसूल मंडळात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. धाराशिव आणि परभणीमध्ये अनुक्रमे 21 आणि 22 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात 12, जालन्यात 5, लातूरमध्ये 10 तर हिंगोली जिल्ह्यातील 2 महसूल मंडळांत मुसळधार पाऊस झाला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, तूर, मका आणि इतर पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिऊर, बोरसर, भायगाव, जानेफळ, नांदगाव या गावांमध्ये पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला. काही तासांतच अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. गेल्या दोन आठवड्यांपासून या भागात पाऊस सुरू असून नागरिकांपुढे “जगायचं कसं?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांमध्ये आर्मीच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. संभाजीनगर व नाशिक जिल्ह्यांतून सैनिकांना बोलावून अनेक गावांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. गोदावरी नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. शाळांना तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांना बाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. पुलांवरून पाणी वाहू लागल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
आस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच दुष्काळ आणि अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेकडो जनावरे दगावल्याने पशुपालकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हा प्रशासनाच्या पथकांना नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण सतर्क आहे. मात्र पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे.