जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
प्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्यवेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटातून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी ‘सोबत’ या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या आजुबाजूला घडणारा ताजा विषय मनोरंजक पद्धतीनं या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
अल्पवयीन प्रेमाचा शोध हा चित्रपट घेणार आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला “सोबत”हा चित्रपट 25 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पाठशाला, हमने जिना सिख लिया, डेहराडून डायरी, हनुमान असे बरेच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केलेल्या मिलिंद उके यांनी’सोबत’ दिग्दर्शित केला आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटातून वेगळा विषय हाताळला आहे. त्यामुळे “सोबत” या चित्रपटाचाही त्याला अपवाद ठरणार नाही.
‘सोबत’मध्ये नव्या-जुन्या कलाकारांचा कसदार अभिनय पहायला मिळणार आहे. हिमांशू विसाळे आणि मोनालिसा बागल ही फ्रेश जोडी या चित्रपटात आहे.