Tanmay Vanmali Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रतिभावान तरुण सिनेमॅटोग्राफर तन्मय राजेंद्र वनमाळी यांचे अवघ्या 31 व्या वर्षी अकाली निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अल्पावधीतच आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवणाऱ्या तन्मय यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
तन्मय वनमाळी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अनुभवी सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी सहाय्यक म्हणून काम करत चित्रपटसृष्टीतील तांत्रिक बारकावे आत्मसात केले. फ्रेमिंगची समज, प्रकाशयोजनेचा अचूक वापर आणि दृश्यांना प्रभावीपणे मांडण्याची कला यामुळे ते लवकरच दिग्दर्शकांच्या नजरेत भरले.
त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्समध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी त्यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी विशेष चर्चेत आली होती. या चित्रपटातील दृश्यांची मांडणी, कॅमेऱ्याची शैली आणि रंगसंगती यामुळे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.
याशिवाय ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. या चित्रपटात गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या. अशा विविध प्रोजेक्ट्समधून तन्मय यांनी आपल्या कलेचा ठसा उमटवला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रामायण’ या चित्रपटाच्या कामातही त्यांनी योगदान दिले होते. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनामुळे आगामी प्रोजेक्ट्सवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तन्मय वनमाळी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेली दृश्ये आणि त्यांनी दिलेला सर्जनशील स्पर्श कायम लक्षात राहील, असे अनेकांनी म्हटले आहे.
हेही वाचा: Randeep Hooda: अभिनेता रणदीप हुड्डा झाला बाबा! पत्नी लिन लायशरामने दिला गोंडस मुलीला जन्म
तन्मय वनमाळी हे मेहनती, शांत स्वभावाचे आणि कामाप्रती प्रचंड समर्पित असे व्यक्तिमत्त्व होते, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. मराठी चित्रपटसृष्टीत एक आशादायक आणि प्रतिभावान सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांची ओळख निर्माण होत असतानाच त्यांचे अचानक जाणे ही अत्यंत वेदनादायक घटना ठरली आहे.
त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने एक उभरता कलाकार गमावला आहे. मात्र त्यांनी कॅमेऱ्यामागून उभे केलेले सुंदर दृश्यविश्व आणि केलेले काम प्रेक्षकांच्या मनात कायम जिवंत राहील.