नागपूर: रोखठोक आणि परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झाला होता.
या वादाचे गांभीर्य लक्षात घेता, शरद पोंक्षे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसारित करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या एका वादग्रस्त ठरलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली असून, कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे स्पष्ट केले आहे.
या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणाले की, “सध्या माझं एक वक्तव्य मीडिया फिरवतंय. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून मोडून फोडून मीडियावाले दाखवत असतात. माझं संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातलं मागचं पुढचं सगळं कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन मीडियावाले नेहमी माझी वक्तव्य टाकत असतात.”
शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, ‘माझी दोन वक्तव्य मीडियाने चालवलेली. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरं मनुस्मृतीजर वाचली असती, मूळ मनुस्मृती …तर ती जाळली नसती, असं मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवत गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळं आपण वाचतच नाहीये. हे जर वाचलं तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलंय. हा माझा मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असं म्हटलं. सगळे वेद, उपनिषदं संपूर्ण भाषण युट्युबवर आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, आधाराला घेतलेलीआहे हे त्यांनी स्वतः म्हटलंय.”
या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, “तरीसुद्धा मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या वक्तव्यानं जर कोणी दुखावलं गेलं असेल तर मी क्षमा मागतो. मी दिलगिरी व्यक्त करतो मनापासून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज सगळेच आपले दैवत आहेत. मी आज 25 वर्षे व्याख्यानं देतोय. 25 वर्षामध्ये मी कधीच कोणत्याही महापुरुषाबद्दल मी एकही अवाक्षर वाईट काढलेले नाहीये. किंबहुना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास सध्या करतोय आणि बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत ते कळावेत, हे सांगण्यासाठी माझी धडपड चालू आहे. पण ‘मनुस्मृती जर वाचली असती तर ती जाळली नसती’ या माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा, आपण एक भारतीय म्हणून एकसंध उभे राहायला पाहिजे हा माझा मुख्य हेतु आहे” असे म्हणत शरद पोंक्षे यांनी माफी मागितली आहे.
सध्या त्यांचा हा माफीनामा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.