जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासच्या शेजारी एक वृद्ध महिला आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी दिसली. कदाचित गोंधळून म्हातारी पत्ता विसरली असेल म्हणून आमतच्या प्रतिनिधीनं तिला काही मदत करता येईल यासाठी तिच्याकडे चौकशी केली. परंतु ज्यावेळी तिच्याबद्दल माहिती जाणून घेतली त्यावेळी आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण ती म्हातारी कोणी साधारण व्यक्ती नव्हती तर, ‘धुमधडाका’ या सुपरहिट मराठी चित्रपटातील अशोक सराफ यांची ती प्रियतमा म्हणजेच त्या चित्रपटातील नायिका होती.
ही नायिका म्हणजेच सुरेखा राणे ऊर्फ ऐश्वर्या राणे. अमिताभ बच्चन, परबीन बाबी, निळू फुले, जयश्री गडकरी यासारख्या दिग्गज कलाकारांसमवेत त्यांनी सहाय्यक कलाकार म्हणून काम केले आहे. परंतु दुर्दैवाने त्यांची कारकिर्द ऐन बहरात असताना अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान घोड्यावर पडून त्यांचा मोठा अपघात झाला.
यामध्ये त्यांच्या पाठीचे हाड मोडल्याने कारकिर्दीला ब्रेक लागला. खोलपर्यंत तिची चौकशी केल्यानंतर आमच्या प्रतिनिंधींनी तिची समस्या जाणून घेतली. आपल्या उतारवयात या नायिकेला शासकीय मदतीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजविण्य़ाची वेळ आली आहे. नक्की काय समस्या आहे ते आपण खुद्द सुरेखा राणे यांच्याकडूनच जाणून घेऊयात.