जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन हर्षल रावते या तरुणानं आत्महत्या केलीय. हर्षल रावते असं या 43 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
हर्षल मूळचा औरंगाबादमधील पैठणचा असून, सध्या चेंबुरमधील रहिवासी होता. मेहूणीच्या हत्येप्रकरणी हर्षल रावते औरंगाबादमधील तुरुंगात शिक्षा भोगत होता. सध्या तो पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. मंत्रालयात गृह विभागात कामासाठी तो आल्याची माहिती समोर आलीय.
त्यावेळी त्याने पाचव्या मजल्यावरुन उडी मारली आणि आत्महत्या केलीये. 2014 पासून हर्षल रावते मेहूणीच्या हत्येप्रकरणी तुरुंगात होता. हर्षल 10 जानेवारीपासून 30 दिवसांच्या पॅरोलवर होता. त्यामुळे आजचा दिवस त्याच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता.
दरम्यान, हर्षलच्या आत्महत्येनंतर त्याच्याकडून सुसाईड़ नोट मिळालीय. हर्षल रावतेने पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथं उपचारादरम्यान हर्षलचा मृत्यू झालाय. त्यामुळे हे मंत्रालय आहे की आत्महत्यालय अशी टीका विरोधकांकडून करण्यात येतेय.