जालना: मराठा आरक्षण आणि कुणबी नोंदींसंदर्भातील विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांचे आमरण उपोषण सुरू झाले असून राज्यभरातून मराठा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. विशेषतः ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी मिळालेली नाही, अशा नागरिकांना आंदोलनस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी यापूर्वीच केले होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. अनेक नागरिकांच्या नोंदी उपलब्ध झाल्यानंतरही त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळत नसल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
उपोषणापूर्वी पोलिसांकडून नोटीस
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गोंदी पोलीस ठाण्याकडून मनोज जरांगे पाटील यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६८ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गणेश गुरले यांनी ही नोटीस देत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १० अटींचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पोलिसांनी घातल्या 10 अटी
महामार्ग किंवा सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
आंदोलनस्थळी येणाऱ्या वाहनांची पार्किंग प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच करावी.
पार्किंग आणि गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवक व समन्वयक नियुक्त करून त्यांची यादी पोलिसांना सादर करावी.
ध्वनीप्रदूषण कायदा आणि संबंधित नियमांचे काटेकोर पालन करावे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशांचे पालन करावे.
कोणत्याही समाज, जात किंवा धर्माच्या भावना दुखावतील अशी वक्तव्ये किंवा कृती टाळावी.
प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर भाषणे करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करावी.
वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी जनरेटरची व्यवस्था ठेवावी.
आंदोलनस्थळी ज्वलनशील पदार्थांचा वापर टाळून शांतता आणि सुरक्षितता कायम ठेवावी.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या अटींचे उल्लंघन झाल्यास प्रचलित कायद्यांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल.
नोटीसवरच जरांगेंचे सडेतोड उत्तर
पोलिसांनी दिलेल्या नोटीसवर मनोज जरांगे पाटील यांनी लेखी उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी आंदोलन हे गेल्या तीन वर्षांपासून लोकशाही मार्गाने आणि शांततेत सुरू असल्याचे नमूद केले. तसेच यापूर्वी सरकारकडून कायद्याचे उल्लंघन करून मराठा समाजावर पोलिस बळाचा वापर झाल्याचा आरोप करत, भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असे त्यांनी नोटीसवरच लिहून दिले.