Manohar Mama Arrested : बाळूमामांचे वंशज म्हणवणाऱ्या स्वयंघोषित बाबाचा आणखी एक प्रताप उघड; पुण्यातून भोंदू मनोहर मामाला अटक

स्वतःची संत बाळूमामांचे भक्त म्हणून ओळख निर्माण करणारे मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

Manohar Mama Arrested : बाळूमामांचे वंशज म्हणवणाऱ्या स्वयंघोषित बाबाचा आणखी एक प्रताप उघड; पुण्यातून भोंदू मनोहर मामाला अटक

सोलापूर : स्वतःची संत बाळूमामांचे भक्त म्हणून ओळख निर्माण करणारे मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांना अखेर सोलापूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस पथकाने ही कारवाई केली. पुण्यात झालेली ही अटक वरिष्ठ पातळीवरील आदेशाने केल्याचे समजते. या कारवाईमुळे अनेकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या आधी बारामती पोलीस स्टेशनमध्ये भोसले यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना अटकही झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, मनोहर भोसले हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील रहिवासी असून, त्यांनी गेल्या काही वर्षांत अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. संत बाळूमामांच्या नावाने मठ व मंदिर उभारून त्यांनी विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना उपाय सुचवण्याचा दावा केला होता. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी होत होती. मात्र, प्रसिद्धीसोबतच त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. भक्तांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचे आरोप त्यांच्या विरोधात करण्यात आले. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील ग्रामस्थांनी आणि देवस्थानाशी संबंधित व्यक्तींनी मनोहर भोसले यांच्यावर संत बाळूमामांचे नाव वापरून लोकांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवला. याबाबत ग्रामपंचायतीने निषेध ठरावही मंजूर केला होता. याशिवाय, भोसले यांनी स्वतःला संत बाळूमामांचे वंशज असल्याचे भासवून लोकांचा विश्वास संपादन केल्याचाही आरोप करण्यात आला होता. जरी त्यांनी नंतर हा दावा फेटाळला होता. त्यांच्या नातेवाईकांकडूनही आर्थिक गैरव्यवहाराबाबत तक्रारी समोर आल्याने प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले.

हेही वाचा : Amol Mitkari : ‘झाडाला बोकड लटकवलं, ईशान्येश्वर मंदिरात अघोरी पूजा अन् विमानाचा अपघात…’; अमोल मिटकरींच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

दरम्यान, उंदरगाव येथील त्यांचा मठ आणि मंदिर काही काळापासून बंद असल्याचेही दिसून आले होते. मनोहर भोसले बेपत्ता झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र त्यांनी या अफवा फेटाळल्या होत्या. आता अटकेनंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सोलापूरसह इतर ठिकाणी दाखल गुन्ह्यांच्या आधारे त्यांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील सत्य काय, हे आगामी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. आता अजून एक भोंदू बाबा पुढे आला आहे. अनेक बडे नेते बुवाच्या गळाला लागले होते, याचा तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कुर्डूवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत मनोहर मामा याच्याविरोधात 192/26 एक गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये फसवणूक आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे. यातील आरोपी मनोहर मामा भोसले याच्याविरोधात फसवणूक करून छळ केल्याची तक्रार होती. त्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे. या मनोहर मामा भोसलेला आम्ही ताब्यात घेतले असून पुढील कारवाई चालू आहे. या आधी 2021 मध्ये मनोहर मामा भोसले यांच्यावर 4 गुन्हे दाखल झाले होते. सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीणला हे गुन्हे दाखल झाले होते. बलात्कार, विनयभंग आणि जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार या सर्व गुन्ह्यांमध्ये आम्ही खोलवर जाऊन तपास करणार आहोत, असे कुलकर्णी यांनी नमूद केले. 

पुणे येथे सोलापूर ग्रामीण पोलीस पथकाने अटक केलेल्या मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा यांच्याविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होती. त्यांना कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले असून सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची कसून चौकशी करीत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number