भिवंडी तालुक्यातील एका छोट्याशा गावात घडलेली एक अनोखी घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. साधारणपणे आंब्याच्या झाडावर फक्त आंबेच लागतात, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, येथे एका शेतकऱ्याच्या आंब्याच्या झाडावर चक्क सीताफळ लागल्याचे पाहायला मिळाल्याने ग्रामस्थ चकित झाले आहेत. ही घटना भिवंडी-वाडा मार्गावरील साईगाव अस्नोली परिसरात घडली. संबंधित झाडावर नेहमीप्रमाणे आंबे लागले होतेच, पण त्याच फांदीवर एक सीताफळही स्पष्टपणे दिसून आले. सुरुवातीला ही बाब मुलांच्या लक्षात आली. त्यांनी ही गोष्ट मोठ्यांना सांगितल्यानंतर सर्वांनी प्रत्यक्ष झाडाजवळ जाऊन पाहणी केली. हे दृश्य पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
या विचित्र घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील नागरिकही हा ‘निसर्गाचा चमत्कार’ पाहण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत. काही जण याला दैवी शक्तीचे रूप मानत आहेत, तर काहीजण यामागे वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी तज्ज्ञांच्या मते, अशा घटना क्वचितच घडतात आणि त्यामागे ‘ग्राफ्टिंग’ किंवा वनस्पतींच्या वाढीतील काही नैसर्गिक बदल कारणीभूत असू शकतात. मात्र, याबाबत निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी अधिक तपासाची गरज असल्याचेही सांगितले जात आहे.सध्या मात्र या घटनेमुळे परिसरात उत्सुकता वाढली असून, एकाच झाडावर दोन वेगवेगळ्या फळांचे दर्शन लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.