कोकणचा राजा मानला जाणारा हापूस आंबा यंदा निसर्गाच्या दुहेरी संकटात सापडला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. केवळ दहा टक्के उत्पादन शिल्लक असताना आता नव्या संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे.आधी अवकाळी पाऊस व धुक्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले, तर आता कडाक्याच्या उन्हामुळे तयार होत असलेला आंबा झाडावरून गळून पडत आहे.
मालवण तालुक्यातील आंबा बागायतदार विजय सावंत यांच्या बागेत या संकटाचे विदारक दृश्य पाहायला मिळत आहे. त्यांच्या बागेत सुमारे 900 हून अधिक कलमे आहेत. मात्र, गेल्या अवघ्या दोन दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे तब्बल 15 हजारांहून अधिक आंबे गळून पडले आहेत. हातातोडाशी आलेला घास निसर्ग हिरावून नेल्यामुळे सावंत यांच्यासह परिसरातील इतर शेतकरीही हवालदिल झाले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि दाट धुक्यामुळे आंब्याचा मोहोर मोठ्या प्रमाणात करपला होता. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आधीच निर्माण झाली होती. सध्या कोकण किनारपट्टीवर उष्णतेची लाट असून हवामान खात्याने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
वाढत्या तापमानामुळे फळांना मिळणारा ओलावा कमी होऊन मोठ्या प्रमाणावर फळगळती सुरू झाली आहे. आधी पाऊस आणि धुक्याने मोहोर खाल्ला, आणि आता उरलासुरला आंबा उन्हामुळे जमिनीवर पडत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्यामुळे मशागत आणि औषध फवारणीचा खर्च निघणेही कठीण झाले आहे त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी पूर्णतः अडचणीत सापडला आहे.