जी- २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर देशभरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील प्रगतीवर विशेष भर दिला जात आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून समुद्र किनारे, सागरी जैवविविधता यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याच्या उद्देशाने जगभरातील काही निवडक समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत मालवण येथील चीवला बीच येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम समुद्राच्या स्वच्छतेची तसेच प्लास्टिकऐवजी पर्यावरण पूरक साधनांच्या वापरास प्रोत्साहन म्हणून नगरपालिकेतर्फे कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध संस्था, नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, शासकीय कर्मचारी सहभागी झाले.