मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील घाटमाथ्यांवर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, माळशेज घाटात मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्याची गंभीर घटना घडली आहे. कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील करणजाळे गावाजवळ हा प्रकार घडल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने माळशेज घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नसली, तरी रस्त्याची झालेली हानी पाहता मोठा अपघात टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घाट परिसरातील माती सैल झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून रस्त्याचा मोठा भाग अचानक खचला. प्राथमिक पाहणीत सुमारे पाच ते सहा फूट खोलपर्यंत रस्ता खचल्याचे स्पष्ट झाले असून जवळपास 100 मीटरपर्यंतचा भाग बाधित झाला आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे धोकादायक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सुरुवातीला केवळ छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, भूस्खलनाचा धोका वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी एसटी बस, ट्रक, टेम्पो आणि इतर अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. आता मात्र चारचाकी आणि दुचाकींसह सर्व वाहनांना या मार्गाने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत माळशेज घाट पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यायी मार्गांची व्यवस्था केली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी आळेफाटा-राजगुरुनगर-चाकण-तळेगाव एमआयडीसी-लोणावळा-मुंबई हा मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आळेफाटा-संगमनेर-नाशिक-कसारा-कल्याण-मुंबई हा पर्यायही वाहनचालकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.
सध्या संबंधित यंत्रणांकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन सुरू असून भूस्खलनाचा धोका पूर्णपणे टळल्यानंतरच वाहतूक पुन्हा सुरू केली जाणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने घाट परिसरात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.