Sugar Scam: एक साखरेचं पोतं, दोन बारकोड अन् अजब डोकं! या नामांकित स्टोअरला एका ग्राहकाने लुटलं

या ग्राहकाने प्रत्येक खेपेला 20 किलो याप्रमाणे सात महिन्यांत तब्बल 860 किलो साखरेची अफरातफर केली आहे.

Sugar Scam: एक साखरेचं पोतं, दोन बारकोड अन् अजब डोकं! या नामांकित स्टोअरला एका ग्राहकाने लुटलं

मुंबई: तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारीच्या पद्धतीही तितक्याच 'स्मार्ट' झाल्या आहेत, याचा प्रत्यय नुकताच मुंबईतील मालाड परिसरात आला. मालाडमधील एका नामांकित डिपार्टमेंटल स्टोअरला एका अज्ञात ग्राहकाने चक्क 860 किलो साखरेचा चुना लावला आहे. दिसायला ही घटना केवळ साखरेची चोरी वाटत असली, तरी ज्या पद्धतीने सात महिने हा 'गोड' व्यवहार सुरू होता, ते पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. "साखरेच्या गोडव्यात फसवणुकीचा कडवटपणा" मिसळणाऱ्या या अजब चोरीची चर्चा आता संपूर्ण व्यापारी वर्गात रंगली आहे.

काय आहे 'बारकोड'चा हा अजब खेळ?

या फसवणुकीचे केंद्रस्थान होते स्टोअरमधील साखरेची 50 किलोची पोती. स्टोअरच्या नियमानुसार, या 50 किलोच्या पोत्यावर दोन स्वतंत्र बारकोड असायचे. एक 30 किलोसाठी आणि दुसरा 20 किलोसाठी. ग्राहकाने बिलिंग करताना हे दोन्ही बारकोड स्कॅन करून पूर्ण 50 किलोचे पैसे भरणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित अज्ञात ग्राहकाने या नियमातील तांत्रिक पळवाट शोधली. त्याने तब्बल सात महिने अत्यंत चलाखीने 20 किलोचा बारकोड पोत्यावरून गायब करायचा आणि बिलिंग काउंटरवर केवळ 30 किलोचे पैसे भरायचे, असा सपाटा लावला होता.

'चोरी वर शिरजोरी'; कर्मचाऱ्यांनाही दिले युक्तीचे डोस

हा ग्राहक केवळ तांत्रिकदृष्ट्याच हुशार नव्हता, तर तो मानसिक दबाव टाकण्यातही निष्णात होता. जुलै 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत त्याने एकूण 43 वेळा हा प्रताप केला. जेव्हा कधी स्टोअरमधील कर्मचाऱ्यांना वजनाबाबत किंवा बारकोडबाबत शंका यायची, तेव्हा हा ग्राहक नम्र राहण्याऐवजी कर्मचाऱ्यांवरच दबाव टाकायचा. "पोत्यात केवळ 30 किलोच साखर आहे," असा ठाम दावा करून तो उरलेली 20 किलो साखर विनामूल्य पदरात पाडून घ्यायचा. "चोरी वर शिरजोरी" या म्हणीचा प्रत्यय येथे पदोपदी आला असावा.

हेही वाचा: Bomb Threat : माहीमच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाला बॉम्बनं उडवण्याची धमकी; पोलिसांचा तपास सुरू

सात महिन्यांचा हिशोब आणि 37 हजारांचा फटका

या ग्राहकाने प्रत्येक खेपेला 20 किलो याप्रमाणे सात महिन्यांत तब्बल 860 किलो साखरेची अफरातफर केली आहे. स्टोअरच्या अंतर्गत ऑडिटमध्ये जेव्हा साखरेचा साठा आणि झालेली विक्री यांचा मेळ बसला नाही, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एकूण 37,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट होताच व्यवस्थापनाचे डोळे उघडले. एका साध्या बारकोडच्या जोरावर इतकी मोठी फसवणूक होऊ शकते, याची पुसटशी कल्पनाही व्यवस्थापनाला नव्हती.

बांगूर नगर पोलिसांकडून तपास सुरू

याप्रकरणी स्टोअरच्या तक्रारीवरून मालाडमधील बांगूर नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि बिलिंग डिटेल्सच्या आधारे या 'स्मार्ट' चोराचा शोध घेतला जात आहे. डिजिटल व्यवहारांच्या जगात मानवी त्रुटींचा फायदा घेऊन कशा प्रकारे आर्थिक गंडा घातला जाऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. या घटनेमुळे आता शहरातील इतर मोठ्या मॉल्स आणि डिपार्टमेंटल स्टोअर्सनी त्यांच्या बारकोड सिस्टीम आणि सुरक्षेचा फेरआढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

ही घटना केवळ एका स्टोअरची फसवणूक नसून, रिटेल क्षेत्रातील सिस्टीममधील त्रुटींवर बोट ठेवणारी आहे. ज्या ग्राहकावर विश्वास ठेवून ही यंत्रणा राबवली जाते, त्याच विश्वासाला तडा गेल्याने व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. आता पोलीस या 'साखरचोरा'च्या मुसक्या कधी आवळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी "सावधानता बाळगणे" हाच सर्वात मोठा धडा या निमित्ताने मिळाला आहे.

हेही वाचा: India's Superheroes: भारतीय ऊर्जेचे 'पाच सुपरहिरोज'! युद्धाच्या आगीतून वाट काढत भारताला वाचवण्यासाठी धावले; होर्मुज सामुद्रधुनीतील भारताच्या मोहिमेची 'इनसाइड स्टोरी'

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number