Rajmachi Landslide: वीकेंडला लोणावळ्यात मोठी दुर्घटना; राजमाची मार्गावर अवाढव्य दरड कोसळली; 100 हून अधिक पर्यटक…

शनिवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध राजमाची किल्ल्याकडे गेलेल्या पर्यटकांवर मोठे संकट ओढवले. या मार्गावर अचानक एक अवाढव्य दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

Rajmachi Landslide: वीकेंडला लोणावळ्यात मोठी दुर्घटना; राजमाची मार्गावर अवाढव्य दरड कोसळली; 100 हून अधिक पर्यटक…

Rajmachi Landslide: लोणावळा आणि मावळ परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळांवर दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी प्रसिद्ध राजमाची किल्ल्याकडे गेलेल्या पर्यटकांवर मोठे संकट ओढवले. या मार्गावर अचानक एक अवाढव्य दरड कोसळल्याची घटना घडली आहे. डोंगरावरून निथळलेले मोठमोठे दगड आणि मातीचा ढिगारा थेट रस्त्यावर आल्यामुळे सुमारे 100 ते 125 फूट रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी, किल्ल्याच्या दिशेने गेलेले अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले आहेत.

वाहनांची कोंडी; पायी परतण्याचा प्रवाशांचा प्रयत्न
दरम्यान, शनिवार-रविवारच्या वीकेंड सुट्टीमुळे राजमाची किल्ला आणि कातळदरा धबधबा पाहण्यासाठी शेकडो दुर्गप्रेमी या भागात दाखल झाले होते. दरड कोसळल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळजनक उडाली. पायदळ प्रवास करणारे काही पर्यटक कसाबसा मार्ग काढत सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. मात्र, चारचाकी आणि दुचाकी वाहनांसह गेलेले जवळपास 100 पर्यटक रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले आहेत. डेला रिसॉर्टच्या मदतीने तातडीने जेसीबी आणि मजूर मागवून रस्ता साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरडीचा आकार प्रचंड असल्याने हा रस्ता पूर्णपणे मोकळा होण्यासाठी किमान 1 ते 2 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यटक पायी चालत लोणावळ्याच्या दिशेने येऊ शकतात, मात्र त्यांची वाहने पुढील 2 दिवस तिथेच अडकून राहतील.

 या ताज्या घटनेमुळे लोणावळ्यापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजमाची मार्गाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हा रस्ता पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा प्रशासनाकडे या रस्त्याच्या कायमस्वरूपी मजबुतीकरणाची मागणी केली आहे. पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सुरक्षेसाठी शासनाने आतातरी यावर दीर्घकालीन ठोस उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा – Mumbai Rain Update : पावसाचा वाहतुकीवर परिणाम! हायवेवर गाड्यांचा रांगा, रस्त्यांवर गुडघाभर पाणी, सबवे तुंबले; मुंबईकरांचा परतीचा मार्ग कठीण

लोणावळ्यात पर्यटकांची अलोट गर्दी; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
दुसरीकडे, सततच्या पावसामुळे लोणावळ्यातील ओढे, नाले आणि धबधबे दुथडी भरून वाहात आहेत. निसर्गाचे हे सुंदर रूप आणि धुक्याची चादर अनुभवण्यासाठी भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, कार्ला आणि भाजे लेणी परिसरात पर्यटकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासनाने पर्यटकांना धबधब्यांच्या परिसरात विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः सेल्फी काढण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नये आणि सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number