मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी झाली आहे. माणगाव म्हसळा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माणगाव म्हसळा मार्गावरील घोणसे घाटात टँकरचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच माणगाव म्हसळा पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आणि परिस्थितीसह वाहतूक नियंत्रण करण्यास शर्थीचे प्रयत्न केले. यावेळेस संपुर्ण रस्तावर पेट्रोल डिझेल असल्याने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर माती टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं.
श्रीवर्धन, हरिहरेश्वरहून मुंबईकडे परत निघालेले पर्यटक अपघातामुळे वाहतूक कोंडीत अडकले आहेत. म्हसळा, श्रीवर्धनमध्ये पेट्रोल डिजेल घेऊन निघालेला टँकर घोणसे घाटातील अवघड वळणावर अपघातग्रस्त झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर प्रवाशांनी म्हसळा गोरेगाव माणगाव रस्त्याचा वापर करवा अशा सूचना पोलिसांनी प्रवाशांना दिल्या आहेत. दरम्यान माणगाव-म्हसळा मार्गावरील घोणसे घाटात टँकरला अपघात होऊन वाहतूक विस्कळीत झाली असून तब्बल दोन तास वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.