FIFA World Cup 2026: FIFA विश्वचषकावर मोठं संकट! 97 सामने धोक्यात; धक्कादायक अहवालामुळे वाढली चिंता

'क्लायमेट सेंट्रल' या हवामान संशोधन संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या विश्वचषकातील बहुतांश सामन्यांदरम्यान प्रचंड उष्णतेचा सामना खेळाडूंना करावा लागू शकतो.

FIFA World Cup 2026: FIFA विश्वचषकावर मोठं संकट! 97 सामने धोक्यात; धक्कादायक अहवालामुळे वाढली चिंता

FIFA World Cup 2026: फुटबॉल हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि वेगवान खेळांपैकी एक मानला जातो. मात्र, आगामी FIFA विश्वचषक 2026 स्पर्धेवर आता जागतिक तापमानवाढीचे गंभीर संकट निर्माण झाल्याचे समोर आले आहे. 'क्लायमेट सेंट्रल' या हवामान संशोधन संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणाऱ्या विश्वचषकातील बहुतांश सामन्यांदरम्यान प्रचंड उष्णतेचा सामना खेळाडूंना करावा लागू शकतो. यामुळे खेळाडूंच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या मैदानावरील कामगिरीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

104 पैकी 97 सामन्यांना उष्णतेचा धोका

संशोधकांनी विश्वचषकातील सर्व सामन्यांचे हवामानाच्या दृष्टीने विश्लेषण केले असून त्यातून चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत. स्पर्धेतील एकूण 104 सामन्यांपैकी तब्बल 97 सामने अति-उष्ण हवामानाच्या प्रभावाखाली येऊ शकतात. याशिवाय, 49 सामन्यांदरम्यान प्रतिकूल हवामानाची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच 26 सामन्यांच्या ठिकाणी हवामान बदलामुळे उष्णतेची तीव्रता सुमारे 10 टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले आहे.

उरुग्वे-स्पेन सामना सर्वाधिक संवेदनशील

अहवालानुसार, 26 जून रोजी मेक्सिकोतील ग्वादालाजारा येथे होणारा उरुग्वे विरुद्ध स्पेन हा सामना सर्वाधिक धोकादायक मानला जात आहे. या सामन्यावर उष्णतेचा परिणाम होण्याची शक्यता सुमारे 70 टक्के असून, त्यामागे मानवनिर्मित हवामान बदलाचा वाटा 37 टक्के असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

28 अंश सेल्सिअसनंतर खेळाडूंची क्षमता कमी होते

क्रीडा विज्ञान तज्ज्ञांच्या मते, मैदानावरील तापमान 28 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर फुटबॉलपटूंच्या धावण्याचा वेग कमी होतो. तसेच शरीराला थकव्यातून सावरण्यासाठी अधिक वेळ लागतो. परिणामी, सामन्याचा वेग मंदावतो आणि खेळातील आक्रमकता व रोमांचावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक संघांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करावे लागू शकतात.

हवामान बदलामुळे खेळाचे स्वरूप बदलण्याची भीती

'क्लायमेट सेंट्रल'च्या हवामानतज्ज्ञ शेल विंकली यांनी वाढत्या उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, जगभरात वाढणाऱ्या उष्णतेच्या लाटा आता क्रीडा क्षेत्रावरही परिणाम करू लागल्या आहेत. खेळाडूंना अधिक सुरक्षित पद्धतीने खेळावे लागणार असल्याने फुटबॉलचा वेग आणि आक्रमक शैली बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Lalit Modi: अंडरवर्ल्डकडून मुलाचे अपहरण अन् जीवे मारण्याचा प्रयत्न; ललित मोदींचा 16 वर्षांनंतर खळबळजनक गौप्यस्फोट

जागतिक क्रीडा स्पर्धांसमोर नवे आव्हान

संशोधकांनी प्रदूषणमुक्त काल्पनिक हवामान आणि सध्याच्या हवामानाची तुलना करून हा अभ्यास केला आहे. या निष्कर्षांमुळे मानवनिर्मित हवामान बदल केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून जागतिक क्रीडा स्पर्धांच्या भवितव्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. FIFA विश्वचषक 2026 ही त्याची सर्वात मोठी झलक ठरू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number