Hind Kesari 2026: सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा साताऱ्यात दबदबा; 52व्या हिंदकेसरी स्पर्धेत दमदार विजय मिळवत पटकावला किताब

साताऱ्यात झालेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने विजेतेपद पटकावत मानाची गदा जिंकली.

Hind Kesari 2026: सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा साताऱ्यात दबदबा; 52व्या हिंदकेसरी स्पर्धेत दमदार विजय मिळवत पटकावला किताब

साताऱ्यातील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. महाराष्ट्रातील दोन बलाढ्य मल्ल आमनेसामने आल्याने अंतिम लढतीकडे संपूर्ण कुस्तीविश्वाचे लक्ष लागले होते. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मानाच्या हिंदकेसरी किताबासाठी चुरशीची लढत रंगली. मात्र, सामन्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे अंतिम सामना अपेक्षेपेक्षा लवकर संपला.

कुस्ती सुरू झाल्यानंतर दोन्ही मल्लांनी आक्रमक खेळ दाखवत एकमेकांवर डावपेच टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काही क्षणांतच महेंद्र गायकवाडने जोरदार पकड घेत पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला. या झटापटीत पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेदना असह्य झाल्याने वैद्यकीय पथकाने तातडीने तपासणी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पृथ्वीराजने अखेर सामना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंचांनी महेंद्र गायकवाडला विजेता घोषित करत 52व्या हिंदकेसरी स्पर्धेचा मानकरी ठरवले.

या ऐतिहासिक विजयाबद्दल महेंद्र गायकवाडला मानाची चांदीची गदा, रोख पारितोषिक आणि आकर्षक महिंद्रा थार गाडी देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळला ट्रॅक्टर भेट देण्यात आला. अंतिम सामना अल्पावधीत संपला असला तरी दोन्ही मल्लांच्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकली.

याआधी उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळने दिल्ली एनसीआरच्या रजतविरुद्ध शानदार खेळ केला होता. पृथ्वीराजने 6-2 अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे महेंद्र गायकवाड आणि दिल्लीच्या अनिरुद्ध यांच्यातील सामना अत्यंत रंगतदार ठरला. दोन्ही मल्लांमध्ये गुणांसाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. अखेर महेंद्रने आपल्या ताकदीच्या जोरावर अनिरुद्धला चितपट करत 9-7 अशा फरकाने विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.

साताऱ्यात झालेल्या या स्पर्धेने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेची ताकद देशासमोर दाखवून दिली. महेंद्र गायकवाडच्या विजयाने सोलापूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number