मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारपीट तर, मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, गुरुवारीही हा पाऊस कायम राहणार आहे.

मराठवाड्यात मेघगर्जनेसह गारपीट तर, मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, गुरुवारीही हा पाऊस कायम राहणार आहे. विशेषतः मुंबईत आज जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात काही भागांत मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दक्षिण महाराष्ट्रात गारपिटीचा धोका कायम असून, येत्या काही तासांत वातावरण आणखी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामान विश्लेषकांच्या माहितीनुसार मुंबईत शुक्रवारनंतर पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, हवामान अभ्यासकांच्या मते, कोकण वगळता राज्यातील बहुतांश भागांत दुपारच्या तापमानात 2 ते 4 अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली असून वातावरणात गारवा जाणवतो आहे.

तापमानाच्या घसरणीमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उकाड्यापासून दिलासा मिळालाय. चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भात किमान तापमानात 4 ते 6 अंशांनी घट झाली आहे. धाराशिवशिवाय संपूर्ण मराठवाड्यातही किमान तापमान 3 ते 5 अंशांनी खाली गेलं आहे. जळगाव 6.5, अलिबाग 5.8 डहाणू 5.2, कुलाबा 3.7, सांताक्रूझ 2.4 अंशांनी तापमान घसरले आहे. ही स्थिती 12 मेपर्यंत टिकून राहणार असल्याचे अंदाज आहेत.

दुपारच्या कमाल तापमानातही घट झाल्याचे आकडेवारीत दिसून येते. जळगावमध्ये कमाल तापमान 4.8 अंशांनी घसरले आहे, तर वर्धा 4.5, परभणी 3.9, अमरावती 3.7, चंद्रपूर 3.6, नागपूर 3.4 आणि छत्रपती संभाजीनगर 3.2 अंशांनी कमी तापमान नोंदले गेले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number