राज्यासह संपूर्ण देशात थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडील भागात गारठा वाढत चालला असून उत्तरेकडील गारठ्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. हिमालयीन पट्ट्यातून वाहणाऱ्या थंडीगार वाऱ्यांचा प्रभाव सध्या मध्य आणि पश्चिम भारतावरही जाणवत आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून नागरिकांना पहाटे आणि रात्री तीव्र गारठ्याचा सामना करावा लागत आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे,देशात थंडीचे वारे वाहताना आता अनुभवायला मिळत आहेत. अशातच पंजाब, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, बिहार उत्तर प्रदेश सर्वच भागात थंडी वाढली आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात देखील थंडीचा जोर अनुभवायला मिळतो आहे. दरम्यान मुंबईचे तापमान 15 अंशांच्या आसपास किमान असल्यामुळे मुंबईकरांना थंडीच्या कडाक्याला सामोरे जावे लागू शकते. यावेळी सांताक्रूझ येथे 14.9 अंश सेल्सिअश किमान तापमान नोंद झाली.
त्याचसोबत राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, अकोला, वाशिम, सातारा, भंडारा, गोदिंया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेला असून पुढील काही दिवस किमान तापमान दहा अंशाच्या खाली राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातील सर्वांत नीचांकी 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच शहरात 7.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. तसेच आहिल्यानगर, नाशिक येथे 8 पेक्षाही कमी अंश तापमान आहे. त्याचसोबत अहिल्यानगरमध्ये 7.3, जळगावात 6.9, मालेगावात 8.4, नंदुरबारमध्ये 14.1, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10.6 आणि महाबळेश्वरमध्ये 12.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद दाखल करण्यात आली आहे. तसेच पुढील काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.