Weather Update: डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच राज्यभरातील हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. दक्षिण भारतावर धडकलेल्या डिटवाह चक्रीवादळामुळे एकीकडे जोरदार पावसाची संततधार सुरु असताना, दुसरीकडे उत्तरेकडून येणारे थंड वारे देशातील अनेक राज्यांमध्ये हिवाळ्याचा जोर वाढवत आहेत. महाराष्ट्रातही या दोन्ही परिस्थितींचा मिश्र परिणाम दिसू लागला असून येत्या 48 तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीलंका आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर चक्रीवादळाचा प्रभाव अजूनही कायम असून, या प्रणालीमुळे केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि पुदुचेरी येथे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चक्रीवादळ समुद्रात कमकुवत होत असले तरी त्याचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांच्या वातावरणावर कायम आहे. तथापि, उत्तर भारतात संपूर्ण वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून अनेक भागांत सकाळ-संध्याकाळ दाट धुके पसरत आहे.
या बदलत्या वातावरणाचा प्रभाव महाराष्ट्रावर थेट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील उत्तरेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी मोठी घसरण होऊ शकते. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. काही भागांत तर तापमान एक अंकी पातळीवर जाण्याचीही शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या दोन दिवसांत हवेत स्पष्ट गारवा जाणवत असून सकाळच्या वेळेस थंड वाऱ्यांचा जोर अधिक जाणवतोय. घाटमाथ्यावरच्या भागांत रात्रीचे तापमान झपाट्याने घसरत असून दवाची मात्रा वाढत आहे. 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत कोकण व पश्चिम महाराष्ट्रात दिवसा ढगाळ हवामान राहील, पण रात्री पुन्हा थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज आहे.
हवामान तज्ज्ञ अमित भारद्वाज यांनी राज्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्तरेकडून येणारे वारे आणि यंदाच्या ला निना स्थितीमुळे राज्यात थंडीचा कालावधी नेहमीपेक्षा जास्त टिकू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हिवाळ्याचा हा प्रभाव किमान दोन महिने कायम राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:Crime News: चोरांनी चोरीची हद्दच पार केली! रुग्णालयात मृताच्या अंगावरचे दागिने केले लंपास
या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनीही नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करण्याचा, सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना अतिरिक्त काळजी घेण्याचा आणि लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तापमानातील अचानक होणाऱ्या घटेमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनासंबंधी समस्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत, महाराष्ट्रात हिवाळ्याचा रंग आता खऱ्या अर्थाने चढताना दिसत आहे. तापमानात घसरण आणि वाढलेली गारठ्याची लाट यामुळे नागरिकांना येत्या काही दिवसांत ‘एक स्वेटर नाही पुरणार’ अशी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हं स्पष्टपणे जाणवत आहेत.