मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यातील 13 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्याच्या अनेक भागांत रविवारी ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे काही भागांत वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे.
13 जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या १३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. दरम्यान, मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील इतर अनेक भागांत आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. त्यामुळे पुढील काही तासांत स्थानिक पातळीवर हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी
वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची आणि शेतीतील साहित्याची आवश्यक ती काळजी घ्यावी. जोरदार वाऱ्यामुळे उभी पिके, फळबागा तसेच शेतीमधील साहित्याचे नुकसान होऊ शकते. विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा विजेच्या खांबाजवळ थांबणे टाळावे. उघड्या मैदानात किंवा शेतात असल्यास शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनीही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.