Maharashtra Weather: मान्सूनचा जोर वाढला! राज्यातील अनेक भागांत वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होत असून 17 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे

Maharashtra Weather: मान्सूनचा जोर वाढला! राज्यातील अनेक भागांत वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Weather: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल दिसून येत असून पुढील 24 तास अनेक भागांसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. राज्यात मान्सूनची प्रगती सुरू असताना काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचाही प्रभाव कायम आहे. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील 17 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

कोकण पट्ट्यात मान्सूनने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही ढगाळ वातावरणासह हलक्या सरी कोसळण्याची शक्यता असून हवेत आर्द्रतेचे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात अस्थिरता वाढली आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यासोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे आणि कोल्हापूर परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज असून या भागातील कमाल तापमान 26 ते 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात, तर वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या विभागातील कमाल तापमान 30 ते 38 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. मात्र काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या विभागातील तापमान 26 ते 37 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

विदर्भात मात्र उष्णतेचा प्रभाव अद्याप कायम आहे. नागपूर, अमरावतीसह अनेक जिल्ह्यांत दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. या भागात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतितास इतका राहू शकतो, तर कमाल तापमान 38 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एकूणच राज्यात मान्सूनचे आगमन सुरू असले तरी सर्व भागांत एकसारखा प्रभाव अद्याप दिसून आलेला नाही. हवामानात सातत्याने बदल होत असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच शेतकऱ्यांनी शेतीची कामे स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनपूर्वक करण्याची गरज आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number