Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून अवकाळी पावसाचे सावट अधिक गडद होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, पुढील दोन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून 21 हून अधिक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात एकीकडे प्रचंड उकाडा जाणवत असताना दुसरीकडे अचानक पावसाच्या सरी कोसळत आहेत. या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या भागात विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. याचा फटका शेतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागातही ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. कोकणात रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता असून मुंबईतही अधूनमधून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत गारपिटीमुळे कलिंगड, द्राक्ष, आंबा तसेच ज्वारी आणि हरभरा पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. काढणीला आलेल्या पिकांवर पावसाचा परिणाम झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. वादळी वाऱ्याच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत उभे राहू नये आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.