Maharshtra Weather Update: निसर्गाचा लहरी खेळ! थंडीची पाठ अन् पावसाशी गाठ; महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे सावट

बदलत्या हवामानाचा शेती आणि आरोग्यावर परिणाम होत असून पुढील 48 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

Maharshtra Weather Update: निसर्गाचा लहरी खेळ! थंडीची पाठ अन् पावसाशी गाठ; महाराष्ट्रात पुन्हा अवकाळीचे सावट

मुंबई: 1 जानेवारी 2026 च्या त्या अवकाळी पावसाने जणू राज्याच्या निसर्गचक्राचे वेळापत्रकच कोलमडून टाकले आहे. 'डिसेंबरची थंडी आणि जानेवारीची ऊब' असा काहीसा विसंगत अनुभव घेतल्यानंतर आता फेब्रुवारी महिनाही मूळ हवामानाचे स्वरूप धारण करायला विसरलेला दिसतोय. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असताना महाराष्ट्रात मात्र हुडहुडीऐवजी घामाच्या धारा आणि ढगाळ हवामान असे चित्र पाहायला मिळत आहे. निसर्गाचा हा लहरीपणा केवळ शेतीसाठीच नाही, तर मानवी आरोग्यासाठीही 'धोक्याची घंटा' ठरू लागला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या आकाशात धुक्याची चादर पसरली आहे, पण हे आल्हाददायक धुके नसून विषारी 'धुरके' (Smog) आहे. वायू प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे मुंबईची हवा कमालीची घातक बनली आहे. समोरचे दृश्य स्पष्ट दिसत नसल्याने महानगराला जणू प्रदूषणाने विळखा घातला आहे, असे भीषण वास्तव समोर आले आहे. हवामान विभागाच्या मते, वाऱ्याचा मंद वेग आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे हे प्रदूषणाचे थर जमिनीलगत साचून राहिले आहेत, ज्यामुळे मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय.

हेही वाचा: Maharashtra Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेता नाहीच? राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदे रिक्त

भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. सोमवार आणि मंगळवारी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक राहू शकतो, तर परभणी, हिंगोली आणि धाराशिवमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे. निसर्गाची ही 'वक्रदृष्टी' ऐन काढणीला आलेल्या पिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

तापमानाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये राज्यातील नीचांकी 14.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, इतरत्र पहाटेची किंचित थंडी आणि दुपारी जाणवणारा ऑक्टोबर हिटसारखा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. "ऋतूंचे चक्र फिरले, अन निसर्गाचे गणित चुकले" अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. दक्षिणेकडे तामिळनाडू, केरळपासून ते उत्तरेकडे पंजाब, हरियाणापर्यंत पावसाने हातपाय पसरले आहेत.

फेब्रुवारी महिना संपत आला तरी पावसाचे जाण्याचे नाव नाही, हे जागतिक हवामान बदलाचे (Global Warming) ढोबळ लक्षण मानले जात आहे. वातावरणातील या सततच्या चढ-उतारामुळे तापाचे आणि श्वसनाचे विकार वाढले असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. निसर्गाच्या या बदलत्या रूपाशी जुळवून घेताना आता मानवाला जीवनशैलीचा पुन्हा एकदा विचार करावा लागणार आहे, हे मात्र नक्की.

हेही वाचा: Youth Congress Protest: एआय इम्पॅक्ट समिटमध्ये पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या फोटोंसह घोषणाबाजी; दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number