Milk Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! दूध महागलं; दही, ताक, पनीरसाठीही मोजावे लागणार जास्त पैसे

11 ऑगस्टपासून राज्यात दूध महागणार आहे. गाईच्या दुधाचा दर 62 तर म्हशीच्या दुधाचा दर 78 रुपये होणार असून दही, ताक, तूप आणि पनीरच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

Milk Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री! दूध महागलं; दही, ताक, पनीरसाठीही मोजावे लागणार जास्त पैसे

Milk Price Hike: सणासुदीच्या काळातच सर्वसामान्यांच्या घरखर्चावर आणखी एक भार पडणार आहे. राज्यातील दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांच्या संघटनेने दूध आणि काही प्रमुख दुग्धजन्य पदार्थांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 11 ऑगस्टपासून राज्यभर लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दररोजच्या खर्चात दुधाचा समावेश असलेल्या कुटुंबांच्या बजेटवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. नव्या दरानुसार गाईच्या दुधासाठी ग्राहकांना आता प्रतिलिटर 62 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या गाईच्या दुधाचा दर 60 रुपये आहे. त्याचप्रमाणे म्हशीच्या दुधाचा दरही दोन रुपयांनी वाढणार असून, 76 रुपयांवरून तो 78 रुपये प्रतिलिटर होणार आहे.

दही, ताक आणि पनीरही महागणार

दुधाबरोबरच दही, ताक, तूप आणि पनीर यांसारख्या पदार्थांच्या किमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. संघटनेच्या निर्णयानुसार या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीदरात काही ठिकाणी 10 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार आहे. त्यामुळे केवळ दूधच नव्हे तर रोजच्या स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंच्या खर्चात भर पडणार आहे. या दरवाढीबाबत पुण्यात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. दूध व्यवसायातील वाढता उत्पादन आणि वाहतूक खर्च लक्षात घेऊन दरांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा: Tukaram Mundhe : निकृष्ट अन्न विकणाऱ्यांचे धाबे दणाणले; तुकाराम मुंढेंनी सांगितलं पुढचं टार्गेट, आता थेट रस्त्यावरील…

उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढीचा निर्णय

डेअरी व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या विविध साहित्याच्या किमतीत वाढ झाली आहे. वाहतुकीचा खर्च, पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक आणि इतर साहित्य तसेच उत्पादन प्रक्रियेतील वाढता खर्च यामुळे दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांवर आर्थिक दबाव वाढल्याचे संघटनेने नमूद केले आहे. याशिवाय साखरेच्या दरातील वाढीचाही दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादन खर्चावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकत दूध उत्पादकांना योग्य मोबदला मिळावा आणि डेअरी व्यवसाय आर्थिकदृष्ट्या टिकून राहावा, या उद्देशाने दरवाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, 11 ऑगस्टपासून नवीन दर लागू झाल्यानंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या खरेदीसाठी ग्राहकांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागणार आहे. त्यामुळे आधीच महागाईचा सामना करणाऱ्या कुटुंबांच्या मासिक बजेटवर या दरवाढीचा नेमका किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number