महाराष्ट्रात 'लाडकी बहिण योजना' खूप चर्चेत आहे. विधानसभा निवडणूकांच्या वेळी ही योजना महिलांसाठी सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरून देण्यात आल्या. ज्यावेळी ही योजना आली, त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार, सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले.
आता महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी बारीकपणे केली जात आहेत. यासोबतच ईकेवायसीचीही अट ठेवण्यात आली. यादरम्यान केवाएसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याचे अनेक महिलांनी सांगितले आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे. यावरून महिलांनी महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे.
महिन्याचा हप्ता उशिराने पात्र महिलांच्या खात्यात जमा झाला. मात्र अनेक महिलांना ई-केवायसी करूनदेखील खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
जिल्हाभरातील वेगवेगळ्या तालुक्यांमधील महिलांनी महिला व बालकल्याण विभागाचे कार्यालय गाठत गोंधळ घातला. कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.