‘महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभलेत’, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यांनतर देवेंद्र फडणवीस यांनी ‘फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच, ‘तुरुंगात असलेल्या मंत्र्यांसमोर उद्धव लाचार होते’ असे म्हणत उद्धव ठाकरे यांना संयमाने बोलण्याचाही इशारा फडणवीसांनी दिला आहे.
खरा फडतूस कोण ?
“इतक्या वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.” “खुर्चीकरिता लाळघोटेपणा करता मग खरा फडतूस कोण ?” “दोन- दोन मंत्री तुरुंगात गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाहीत, जे मुख्यमंत्री त्याच मंत्रींभोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय ?”, असा सवालही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे.
“अडीच वर्ष घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला.” असा इशारा फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
काय बोलले होते उद्धव ठाकरे ?
“एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा, उपमुख्यमंत्रीपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारानी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जात आहे. मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहाण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
ठाण्यात शिवसेनेच्या काही महिला कार्यकर्त्यांनी उद्धव गटाची एक महिला रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यातील रुग्णालयात जाऊन त्या महिलेची भेट घेतली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर आगपाखड केली. या आगपाखाडीवर फडणवीसांनी उत्तर दिले आहे.