राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन १२ वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून बारावी परीक्षांच्या मुल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाच्या बारावीच्या परीक्षाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले. (१/२) pic.twitter.com/iSKFeHMqtC — Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 11, 2021
कोरोना काळात विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षितता आणि मानसिक स्वास्थ्य यांनाच प्राधान्य देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. बारावीच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता मूल्यमापनाचे एकसमान सूत्र निश्चित करावं, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्यानं परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असं महाराष्ट्र सरकारने केंद्राला यापूर्वीच सुचवलं होतं असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.