Monsoon Update Maharashtra: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, 30 जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट…

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असून 30 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 ते 72 तासांत जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Monsoon Update Maharashtra: पुढील 24 तास धोक्याचे! राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, 30 जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट…

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा वेग पकडला असून पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळत होती. मात्र आता वातावरणात झालेल्या बदलांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून राज्यातील तब्बल 30 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

कोकण पट्ट्यात पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याचे वारे आणि जोरदार सरींचा अंदाज आहे. विशेषतः किनारपट्टी भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग वाढू शकतो. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. या भागातील शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक मानली जात आहे.

दरम्यान, मराठवाड्यात मान्सूनचा प्रभाव वाढताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही पावसाच्या सरी सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या भागांत ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे. घाटमाथा परिसरात पावसाची तीव्रता अधिक राहू शकते. काही भागांत विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भात एकीकडे पावसाच्या सरी पडत असल्या तरी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अद्याप कायम आहे. अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवू शकते. त्याचवेळी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मान्सूनचा विस्तार वेगाने होत असून येत्या 72 तासांत बहुतांश भागांमध्ये पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी आणि लागवडीच्या कामांना गती मिळणार आहे. तसेच अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. मात्र विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number