Heatwave Maharashtra: राज्यातील तापमानाने सध्या अक्षरशः नागरिकांची काहिली केली आहे. मे महिन्याच्या मध्यातच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून पुणे आणि मुंबईसह अनेक भागांमध्ये तापमानाने विक्रमी पातळी गाठली आहे. विशेषतः पुण्यात यंदाच्या मे महिन्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून मुंबईतही अनेक भागांमध्ये पारा 40 अंशांच्या जवळ पोहोचला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर भारतातून येणारे उष्ण आणि कोरडे वारे, निरभ्र आकाश आणि कमी झालेली आर्द्रता यामुळे राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसासोबतच रात्रीही उकाड्याचा त्रास वाढला असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे.
मुंबईत उकाड्याने जीव कासावीस
मुंबईत आठवड्याची सुरुवातच तीव्र उष्णतेने झाली. सोमवारी शहरातील काही भागांमध्ये कमाल तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याची नोंद झाली. राम मंदिर परिसरात सर्वाधिक 39.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. विक्रोळी येथे 38.5 अंश, वांद्रे येथे 37.3 अंश, तर दहिसरमध्ये 37.1 अंश तापमानाची नोंद झाली.
सांताक्रूझ आणि कुलाबा या अधिकृत केंद्रांवरही तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले. हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक उकाडा जाणवत असल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. रात्रीदेखील उष्णता कायम असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे.
पुण्यात दहा वर्षांतील सर्वाधिक तापमान
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाने विक्रमी पातळी गाठली. सोमवारी शहरात 41.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, जे गेल्या दहा वर्षांतील मे महिन्यातील उच्चांकी तापमान मानले जात आहे. किमान तापमानही 24.8 अंशांवर पोहोचल्याने रात्रीचा उकाडा अधिक वाढला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर अक्षरशः उष्णतेचा दाह अनुभवायला मिळत आहे. सूर्यास्तानंतरही वातावरणातील उष्णता कायम राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
उष्णतेमागचं नेमकं कारण काय?
भारतीय हवामान विभागाच्या मते, उत्तरेकडील राज्यांकडून येणारे गरम आणि कोरडे वारे हे तापमान वाढीचं मुख्य कारण आहे. त्यातच आकाश निरभ्र असल्याने सूर्यकिरणांची तीव्रता अधिक जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा प्रभाव कमी होता, मात्र आता वातावरण कोरडे झाल्याने उष्णतेचा प्रभाव वाढला आहे.
उत्तर महाराष्ट्रात ‘हीट वेव्ह’चा इशारा
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकच्या घाट परिसरात उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नसल्याने तापमान आणखी वाढू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि उन्हात दीर्घकाळ फिरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात पुढील काही दिवस उष्णतेचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.